साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने 'भारतरत्न' पुरस्कार द्यावा,अशी मागणी राज्यसभेत खासदार धनंजय महाडिक यांनी केली. अण्णाभाऊ साठे यांनी समाजातील शोषित आणि दुर्लक्षित वर्गासाठी आपल्या लेखणीतून आवाज उठवला आणि सामाजिक न्यायाची चळवळ मजबूत केली आहे. अण्णाभाऊ साठे यांचे केवळ साहित्यिक योगदान नसून सामाजिक परिवर्तनामध्ये त्यांनी मोठी कामगिरी केली आहे.
अण्णाभाऊ साठे यांनी वंचित, शोषित, बहुजन समाजाच्या व्यथा आणि त्या व्यथेच्या कथा आपल्या विशाल लिखाणातून मांडल्या आहेत. त्यांनी ३५ कादंबर्या, १० लोकनाट्य, २४ लघुकथा, १० पोवाडे, एक नाटक आणि प्रवास वर्णन लिहिले आहे. बालविवाह आणि हुंडा प्रथेला विरोध, अंधश्रध्दा निर्मुलन, जातीय भेदभाव, श्रमिकांचा संघर्ष याबाबत त्यांनी आपल्या लेखणीतून आवाज उठवला. त्यांच्या साहित्याचा रशियन, जर्मन, पॉलिश भाषेत अनुवाद झालाय. तर महिला, दलित, शोषित, पिडीत यांच्या उध्दारासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत.
अण्णाभाऊ साठे यांचे समाज परिवर्तनासाठी केवळ साहित्यिक म्हणून योगदान नाही तर सामाजिक स्तरावरही त्यांनी मोठी कामगिरी केली आहे. या कार्यामुळे साहित्यरत्न, महाराष्ट्र भूषण आणि लोकशाहीर अशी उपाधी मिळालेल्या अण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारने 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सत्कार बहाल करावा. अण्णाभाऊ साठे यांचे कार्य व लिखाण आपल्या सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील.


Post a Comment
0 Comments