Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर अभियानासाठी नियोजन बैठक संपन्न

मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर अभियानासाठी नियोजन बैठक संपन्न

 

कोल्हापूर, दि. ३ (जिमाका): मुख्यमंत्री सचिवालयांतर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मंत्रालय, मुंबई यांच्या समन्वयाने राज्यभर 1 ते 31 जुलै या कालावधीत 'मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर' अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक पार पडली.

 

या अभियानांतर्गत नागरिकांसाठी मोफत संपूर्ण आरोग्य तपासणी, विविध केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांबाबत व्यापक जनजागृती, रक्तदान शिबिरे, आभा (ABHA) कार्ड नोंदणी तसेच आवश्यक आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.  मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाशी संलग्न रुग्णालये, धर्मादाय रुग्णालये, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत रुग्णालये, सार्वजनिक आरोग्य विभागाची रुग्णालये, एचएलएल यंत्रणा, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालये, अन्न व औषध प्रशासन तसेच विविध सेवाभावी संस्थांच्या समन्वयातून हे अभियान राबविण्यात येणार आहे.

 

बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य विभाग, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालये, वैद्यकीय विद्यार्थी, परावैद्यकीय कर्मचारी तसेच संबंधित यंत्रणांनी अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक नियोजन, मनुष्यबळ, औषधसाठा आणि उपचारात्मक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

 

जिल्ह्यातील नागरिकांनी या अभियानाचा लाभ घेऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या