जनसंपर्कात सत्य आणि नैतिकता महत्वाची – उपसंचालक प्रवीण टाके
कोल्हापूर, दि.२१ एप्रिल २०२६ : ‘कोरोना साथीनंतर जनसंपर्क क्षेत्र अधिक महत्वाचे झाले आहे पण विश्वासार्हता टिकवणे हेही आवश्यक झाले आहे. तसेच एआय टूलच्या वापरामुळे कामास गती मिळते मात्र आपत्कालीन स्थितीतही सत्य आणि नैतिकता जपणे आवश्यक आहे, असे मत विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक प्रवीण टाके यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी ‘पीआरएसआय कोल्हापूर चॅप्टरचे’ अधिकृत उदघाटन झाल्याचे प्रवीण टाके यांनी जाहीर केले.
पीआरएसआय कोल्हापूर चॅप्टरचे उद्घाटन रोपट्यास पाणी घालून करताना मान्यवर.
शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागाच्या सभागृहात आयोजित पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया (पीआरएसआय)च्या कोल्हापूर चॅप्टर उद्घघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भारतीय सुरक्षा सेनेच्या दक्षिण कमांडचे जनसंपर्क अधिकारी अंकुश चव्हाण, सोलापूर विद्यापीठाच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ.रवींद्र चिंचोलकर, कोल्हापूर चॅप्टरच्या अध्यक्ष प्रा.डॉ. निशा मुडे-पवार, सचिव विश्वजीत भोसले, कोषाध्यक्ष सचिन मोरे उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ.रवींद्र चिंचोलकर म्हणाले, ‘जनसंपर्क आणि सत्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एआयच्या काळात माहितीची सत्यता तपासणे आवश्यक बनले आहे. जनसंपर्क व माध्यमातील सर्वांनाच प्रॉम्प्ट ट्रेनिंग आवश्यक आहे. एआयचा वापर शिकल्यास नोकऱ्यांची संधी उपलब्ध असेल. पीआरएसआयच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खाजगी क्षेत्रात कामाची संधी मिळू शकते.’ अंकुश चव्हाण म्हणाले, ‘आपत्कालीन स्थितीत पहिले काही तास 'गोल्डन अवर' म्हणून महत्वाचे असतात. यंत्रणेने नेमके काय चुकले ते शोधून दुरुस्ती करणे गरजेचे असते. घटना घडल्यानंतर माध्यमांना तत्काळ योग्य माहिती दिल्यास नंतर खुलासा करण्याची गरज पडत नाही.’
यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे माजी विद्यार्थी व भारतीय सुरक्षा सेनेच्या दक्षिण कमांडचे जनसंपर्क अधिकारी अंकुश चव्हाण यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी वारणा कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रताप पाटील, माझगाव डॉकचे माध्यम सल्लागार पी.एस.पाटील, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, माहिती अधिकारी वृषाली पाटील, आकाशवाणी पुणे वृत्त विभागाचे माधव जायभाई, कोल्हापूर महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी, डॉ. राजेंद्र पारिजात, जेष्ठ पत्रकार डॉ. दशरथ पारेकर, पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाच्या डॉ.वृषाली बर्गे, कणेरी मठाचे जनसंपर्क अधिकारी विवेक सिद्ध, तुतारी जाहिरात संस्थेचे संचालक सचिन मोरे, सरदार जाधव, विवेक पोर्लेकर, टिटवे कॉलेजचे दिग्विजय कुंभार, रोहिणी साळुंखे, डायमंड हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी सुनील भस्मे आदीनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अनुराधा ईनामदार व डॉ. चंद्रशेखर वानखेडे यांनी केले. कार्यक्रमास कार्यकारणी सदस्य, जनसंपर्क, जाहिरात, विविध माध्यम क्षेत्रात कार्यरत व्यक्ती तसेच माध्यम क्षेत्रातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या सहभागींना प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन पीआरएसआय कोल्हापूर चॅप्टर आणि पत्रकारिता विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
---------------------------------------------------------


Post a Comment
0 Comments