सरोळी ता. आजरा येथे भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर.
*सरोळी, दि. २६:*
महामानवांच्या जयंती आणि पुण्यतिथींचे कार्यक्रम केवळ उत्सव म्हणून साजरे करून चालणार नाहीत. त्यांनी दिलेले आदर्श आणि विचार आत्मसात केले पाहिजेत, अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. महामानवांनी उभी हयात केलेले संघर्ष आठवणीत ठेवून त्याप्रमाणे आपल्या जीवनात आचरण करण्याचीही गरज असल्याचेही, ते म्हणाले.
सरोळी ता. आजरा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे आणि डॉ. बाबासाहेबांचे फार मोठे ऋणानुबंध होते. त्यांनी पदवी घेतल्याचे समजताच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी स्वतः मुंबईत जाऊन त्यांची भेट घेतली. बॅरिस्टर पदवीसाठी लंडनला जाण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार, असल्याचेही त्यांनी सांगितले. ते सहकार्य स्वीकारण्याचीही त्यांनी विनंती केली. त्यानंतर डाॅ. बाबासाहेब यांनी करवीरला येण्याचे आणि माणगावमध्ये परिषदेला मार्गदर्शन करण्याचीही विनंतीही, राजर्षी शाहू महाराज यांनी केली. त्यावेळी अस्पृश्यता टोकाला गेली होती आणि त्याबद्दलची प्रचंड चिड राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनात होती. महाडच्या चवदार तळे आणि नाशिकच्या काळाराम मंदिराच्या प्रवेशाने त्यांनी संपूर्ण जगाला माणसामाणसात अस्पृश्यता राहिलेली नाही, असा संदेश दिला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते सुधीरभाऊ देसाई, जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई, आजरा पंचायत समितीच्या सभापती सौ. जयश्री गाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ तेली, एम. के. देसाई, दीपक देसाई, राजू मुरकुटे, संजय गाडे, जितेंद्र कांबळे, दिनकर कांबळे, मधुकर कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.
---------------------------------------------------------

Post a Comment
0 Comments