Type Here to Get Search Results !

Mobile Logo

Mobile Logo

कागल परिसरातील प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा

 


दुकान गाळ्यांच्या भाडे आकारणीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन विषय मार्गी लावणार - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ


 कागल परिसरातील प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा


कोल्हापूर दि १४ ( जिमाका ) : महानगरपालिका हद्दीतील दुकान गाळ्यांच्या भाडे आकारणीबाबत उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासोबत बैठक घेऊन विषय मार्गी लावण्यात येईल , असे प्रतिपादन करुन कागल तालुक्यातील प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या .

जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात मंत्री श्री . मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आढावा बैठक घेण्यात आली , यावेळी ते बोलत होते . बैठकीला अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे , महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे , निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली , उपजिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा शिंगण , इचलकरंजी उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी मौसमी चौगुले , भूसंपादन समन्वयक विवेक काळे , राधानगरी- कागल उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगले . भूसंपादन अधिकारी अर्चना नष्टे , जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले , कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे आदी उपस्थित होते .

यावेळी कसबा कागल येथील म्हाडा गृहप्रकल्पातील वन बीएचके सदनिकेच्या रकमेमध्ये कपात करणे , लिंगायत समाज कसबा सांगाव ( बसवेश्वर मंदिर ) जागेबाबत , केंबळी येथील वाटप झालेल्या गावठाण प्लॉटचा ७/१२ करणे व कुंभार समाजातील भूमीहीन लोकांचे अतिक्रमण नियमित करणे , नालकी हक्काच्या जमीनी आदेशात दुरुस्ती करणे , मौजे पिंपळगाव खुर्द येथील जमीन एकत्रीकरण योजनेच्या नोंदी , आंबेओहोळ प्रकल्पातील संकलन दुरुस्तीची व अन्य प्रलंबित प्रकरणे मार्गी लावणे , दूधगंगा धरणाच्या धरणग्रस्तांना मोबदला देणे तसेच सातारा ते कागल राष्ट्रीय महामार्गाच्या कागल हहीतील प्रलंबित कामांबाबतचा आढावा मंत्री श्री . मुश्रीफ यांनी बैठकीत घेतला . त्या त्या विषयाशी संबंधित प्रकरणांची माहिती घेऊन प्रलंबित सर्व प्रकरणे तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना मंत्री श्री . मुश्रीफ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या .

महानगरपालिका हद्दीतील दुकान गाळे व मालमत्तांची दर आकारणी रेडीरेकनरच्या दराने न करता जुन्या दराने करण्याची मागणी दुकान मालकांनी केली असता हा धोरणात्मक निर्णय असल्यामुळे या विषयाबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक घेऊन हा विषय लवकरात लवकर मार्गी लावू , असे मंत्री श्री . मुश्रीफ यांनी सांगितले .

महसूल व अन्य विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व विषयांचा तात्काळ निपटारा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी केल्या 

संबंधित प्रकरणांशी संबंधित नागरिक , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .




Post a Comment

0 Comments